ब्रम्हपुरी,दि.19ःतालुक्यातील खेड मक्ता साझा क्र. ४ येथील तलाठी राजेंद्र विठोबाजी अतकरे यास २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्या चमूने केली आहे.
तक्रारदार हे मौजा ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून, तक्रारदार यांचे खेड मक्ता येथील 0.४३ हे.आर. जमिनीवर पडलेल्या प्लाटिंग क्षेत्रफळाबाबत आदेशात झालेल्या चुकीकडे लक्ष न देता सातबारे व फेरफार करून देण्याच्या कामाकरिता अतकरे यांनी ३0 हजारांची लाच तक्रारदारास मागितली असता तक्रारदार यांना तलाठय़ास अजिबात लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरोधात ब्रम्हपुरी येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून सोमवारी केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये तडजोडीअंती २५ हजार रुपये लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान आरोपी राजेंद्र विठोबाजी अतकरे यांना २५ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही रश्मी नांदेडकर, पोलिस उपायुक्त / पोलिस अधीक्षक, ला. प्र वि. नागपूर राजेश दुद्दलवार, अप्पर पोलिस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर, तसेच पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, ला. प्र वि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश सुरडकर, पोलिस निरीक्षक ला. प्र. वि. चंद्रपूर, नापोकाँ संतोष येलपूलवार, पोकाँ संदेश वाघमारे, नरेश ननावरे व चालक राहुल ठाकरे यांनी यशस्वी पार पाडली आहे. पुढील तपास कार्य सुरू आहे.





