साकोली,दि.02ः -करोना प्रादुर्भावाच्या काळात लाकडाऊनमुळे अनेकांच्या हातातील रोजगार गेला.तर आधीच कर्जबाजारी असलेले रोजगाराअभावी पुन्हा कर्जबाजारी झाल्याने या परिस्थितीतून उत्पन्न झालेल्या वादाचे परिणाम वाईट होतील अशी कुणी कल्पनाही करीत नाही.परंतु साकोलीत अशाच एका वादातून तलावात उडी घेतलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पती आसिफनेही उडी घेतली.तर आसीफला वाचविण्यासाठी जावई महमूद व भाचा शोएबनेही उडी घेतली.मात्र यात आसिफ व त्यांचा भाचा शोएबला वाचविण्यात अपयश आल्याने या दोघांचाही मुत्यू झाल्याची घटना आज(दि.2)सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान घडली.या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मृतामध्येमध्ये भाजी विक्रेता आसिफ दिलावर शेख (वय 45) व शोएब महमूद दूधकनोजे (वय 15)राहणार सिव्हिल वार्ड साकोली यांचा समावेश आहे. सर्वचजण पाण्यात बुडू लागल्याने त्याठिकाणी असलेल्या आसिफच्या मुलाने आरडाओरड केल्याने लोक धावून गेले.त्यातील काही युवकांनी तलावात उडी घेत आसिफच्या पत्नीला व जावई महमुदला बाहेर काढले.मात्र आसिफ व शोएबला वाचवू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करुन कुटुंबियांना सोपवले.घटनास्थळी पोलिसांना बेलदार समाजाचे गणेश बोकडे ,निलेश घरडे,अमर बोकडे ,शब्बीर पठाण यांनी सहकार्य केले.पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत करीत आहेत.





