गोंदिया,दि.04ः उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर, रावणवाडी परिसरात धडक मोहीम राबविली. दुचाकीवर एकापेक्षा अधिक (डबलसिट) बसलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत आहे. या विषाणूच्या नायनाटासाठी अजूनही लस मिळाली नाही. त्यामुळे गर्दी टाळणे, शारीरिक अंतर ठेवणे, हे या आजारापासून अलिप्त राहण्याचे काही उपाय आहेत. प्रशासनाने तसे सुचविलेदेखील आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश नागरिक या विषाणूच्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेताना दिसत नाही.परिणामी, जिल्हा प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच नवीन नियमावली लागू केली. तरीही दुचाकीवर एकापेक्षा अधिक (डबलशिट) बसणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले नाही. परिणामी, पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारत बुधवारी (ता. 3) एकाच दिवशी 250 वाहनांवर कारवाई केली. एकूण 50 हजार 300 रुपये दंड वसूल केला.बुधवारी (ता. 3) उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर, रावणवाडी परिसरात धडक मोहीम राबविली. दुचाकीवर एकापेक्षा अधिक (डबलसिट) बसलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली. यात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गोंदियातर्फे 162, गोंदिया शहर 12, रामनगर 31, गोंदिया ग्रामीण 24 तर, रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 20 अशा एकूण 249 दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच चालक अधिक दोनपेक्षा जास्त बसलेल्या एका चारचाकी वाहनावर कारवाई करण्यात आली. या सगळ्यांकडून 50 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईतून वाहनचालकांनी धडा घ्यावा, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस विभागाने केले आहे.





