आमगाव(पराग कटरे)दि.६. : तालुक्यातील चिरचाळबांध जवळील डोंगरगाव येथे गोंदिया जिल्हा पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. दरम्यान आज (दि.६) दुपारी पोलीस कर्मचार्यांना बंदुक कशापध्दतीने चालवावे यासंबधी प्रशिक्षण देण्यात येत होते.त्या प्रशिक्षणादरम्यान एका कर्मचार्याच्या हातून बंदुकीची गोळी सुटल्याने एक गर्भवती महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे घटनेंनंतर संबधित पोलीस विभागाने प्रकरण सारवासारव करण्यासाठी चांगलीच मेहनत घेतल्याचे परिसरातील चर्चेवरुन एैकावयास मिळाले.
सविस्तर असे की, तालुक्यातील चिरचाळबांध परिसरातील डोंगरगाव येथे पोलिसांचे प्रशिक्षण सत्र सुरू आहे. या सरावादरम्यान पोलिसांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान आज, बंदुक कशी चालवावी, याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु, अचानक एका कर्मचार्याच्या हातून बंदुकीची गोळी सुटली. दरम्यान प्रशिक्षणाच्या स्थळापासून दीड ते दोन किमी अंतरावरील सितेपार गावातील आपल्या घरगुती कामात व्यस्त असलेल्या वर्षा सुरेश पटले या महिलेच्या पायाला ती गोळी स्पर्श करून निघाली. यामध्ये ती जखमी झाली. सुदैवाने ती गोळी इतरत्र लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी त्या महिलेला उपचारासाठी आमगाव येथील रूग्णालयात घेवून गेले. उपचारानंतर लगेच तिला सुट्टी देण्यात आली. विशेष म्हणजे, यापुर्वीही डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारची घटना घडली होती.या घटनेची माहिती मिळताच ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वर्हाडे यांनी पोलीस अधिक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना संपर्क करुन सदर प्रकरणात जखमी महिलेचा संपुर्ण उपचाराचा खर्च उचलून शक्यती मदत करण्याची मागणी केली आहे.सोबतच प्रशिक्षणादरम्यान होत असलेला निष्काळजीपणाबद्दल खंत व्यक्त केली.
पोलिसांच्या प्रशिक्षणादरम्यान सुटलेल्या गोळीन गर्भवती महिला जखमी
जखमी महिलेला उपचारानंतर पोलिसांनी सोडले घरी, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष वर्हाडेनी केली मदतीची मागणी




