25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता गडचिरोली पोलिस दलातील पीएसआय व हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली पोलिस दलातील पीएसआय व हवालदार एसीबीच्या जाळ्यात

0
713

गडचिरोली,दि.११: पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीस अटक न करण्यासाठी तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस उपनिरीक्षकासह एका हवालदारास रंगेहाथ पकडले. शिवराज माणिकराव कदम(३६) असे पोलिस उपनिरीक्षकाचे, तर मंगलदास कुलसंगे(५०) असे हवालदाराचे नाव आहे. दोघेही पोटेगाव पोलिस मदत केंद्रात कार्यरत आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा चामोर्शी तालुक्यातील गिलगाव येथील रहिवासी असून, त्याच्या भावावर गडचिरोली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७,५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल आहे. परंतु या गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शिवराज कदम याने तक्रारकर्त्यास ७० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ५० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.

मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला असता पोलिस उपनिरीक्षक शिवराज कदम यास हवालदार मंगलदास कुलसंगे याच्यामार्फत तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, पोलिस नाईक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई गणेश वासेकर, किशोर ठाकूर, महेश कुकुडकर, तुळशीराम नवघरे,घनश्याम वडेट्टीवार व सोनी तावाडे यांनी ही कारवाई केली.