गडचिरोली-दि.४ : धानोरा तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या गट्टा-फुलबोडी जंगल परिसरात गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली असून पोलिसांनी माओवाद्यांच्या तीन थ्री नॉट थ्री बंदुका जप्त केल्या आहेत. पेंढरी पोलीस उपविभागांतर्गत गट्टा पोलीस मदत केंद्राचे पोलीस जवान गुरूवारी सायंकाळी गट्टा-फुलबोडी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली असून तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. रात्री उशीरापर्यंत चकमक सुरू होती.
महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली जंगल परिसरात गुरूवारी सी- ६0 पोलीस पथकाच्या जवानांनी नक्षलवाद्यांची बैठक उद्ध्वस्त केली. यावेळी पोलीस व नक्षलवादी यांच्यात २५ मिनिटे गोळीबार चालल्याची माहिती मिळाली आहे.
सिरोंचा पोलीस दलाचे सी- ६0 पथक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या नेतृत्त्वात सोमनपल्ली जंगल परिसरात गुरूवारी नक्षल विरोधी शोधमोहीम राबवित होते.