स्कुलबसचे नियमन अद्याप नाही

0
26

साकोली,दि.05 : करोनाचे संक्रमन रोखण्यासाठी लागलेली टाळेबंदी शिथिल झाल्यावर आता राज्याच्या विविध भागात हळूहळू शाळा व महाविद्यालये सुरू होऊ लागल्याने स्कूलबसही धाऊ लागल्या आहेत. परंतु अद्याप करोना संक्रमणापासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शासनाने ‘स्कूलबस, स्कूलव्हॅन’ची नियमावली स्पष्ट केलेली नाही.  विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या वाहतुकीसाठी कमी संख्येत स्कूलबस, स्कूलव्हॅनही रस्त्यांवर धावत आहेत. या स्कूलबसमधील विद्यार्थ्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी शासनाने स्कूलबसबाबतची नियमावली निश्चित करायला हवी. परंतु त्याकडे दुर्लक्ष आहे. नियम नसल्याने त्यात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसवण्याची पद्धत, मास्क घालायची की नाही, कुणाला सर्दी-खोकला-ताप असल्यास बसमध्ये घ्यायचे की नाही, मुलांच्या शरीराचे तापमान मोजायचे काय, विद्यार्थ्यांना नियम पाळायला प्रोत्साहित कसे करावे यासह इतर गोष्टींवर लक्षच दिले नाही. त्यामुळे सुरू झालेल्या काही स्कूल बससंचालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालक सांगत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संक्रमण वाढल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

त्यातच हा गंभीर प्रश्न असतानाही त्याकडे परिवहन खाते व शालेय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे.

स्कूलबस, स्कूलव्हॅनची प्रत्येक वर्षी योग्यता प्रमाणपत्र तपासणी (फिटनेस) आवश्यक आहे. परंतु करोनामुळे गेल्यावर्षी या तपासण्या झाल्या नाहीत. दरम्यान, केंद्र सरकारने या वाहनांना योग्यता प्रमाणपत्रासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यातच करोनामुळे शाळा बंद असल्याने अनेक स्कूलबसही बंद आहेत. त्यामुळे त्यात बिघाडही संभवतो. तर मार्चमध्ये मुदतवाढ संपल्यावर अचानक योग्यता तपासणीसाठी गर्दी उसळून आरटीओतील कमी पदांच्या जोरावर एवढे योग्यता प्रमाणपत्र शक्य नाही. त्यामुळे या तपासणीबाबतही परिवहन खात्यान ठोस नियोजन करण्याची गरज आहे