११ वर्गांसाठी सात वर्गखोल्या

0
12

तिरोडा,दि.1- तालुक्यातील चिरेखनी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला तीन पिढ्यांचा वारसा आहे. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय नोकरी व इतर उच्च पदावरही आहेत. मात्र सद्यस्थितीत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शाळेची इमारत जीर्ण झाली असून ११ वर्गांसाठी केवळ सात वर्गखोल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय होत आहे.

उपसरपंच सोनू पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद चिरेखनी शाळेत वर्ग एक ते पाचपर्यंत एकूण मुलामुलींची पटसंख्या १२४ आहे. तर वर्ग सहावी ते आठवीपर्यंची पटसंख्या १५६ आहे. अशी एकूण २८० मुले-मुली या शाळेत शिक्षण घेतात. येथे वर्ग सहावीच्या ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या आहेत. मात्र शालेय इमारत धोकादायक असल्यामुळे व वर्गखोल्यांचा अभाव असल्याने सदर दोन्ही तुकड्या एकाच वर्गखोलीत बसविण्यात येतात.

वर्ग सातवीच्याही ‘अ’ व ‘ब’ अशा दोन तुकड्या आहेत. या दोन्ही तुकड्यातील विद्यार्थी वर्गखोलीच्या अभावामुळे सध्या एकाच वर्गखोलीत अध्ययन करतात. तर वर्ग आठवीच्यासुद्धा ‘अ’ व ‘ब’ अशा दोन्ही तुकड्या एकाच वर्गखोलीत बसतात. या तिन्ही वर्गात एकूण सहा तुकड्यांना अध्यापन केले जाते. दाटीवाटीने विद्यार्थी बसत असल्यामुळे शिक्षकांना शिकविताना व विद्यार्थ्यांना शिकून घेताना मोठीच समस्या व अडचण निर्माण होते. मात्र जिल्हा परिषदेकडून अद्यापही वर्गखोल्यांचे बांधकाम व जीर्ण शाळा इमारतीची दुरूस्ती, सुधारणा किंवा नविनीकरण करण्यात आले नाही.

चिरेखनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन वर्गखोल्या अत्यंत जीर्णावस्थेत असून धोकादायक आहेत. त्यामुळे जीवितहानीची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तर चार मोठ्या वर्गखोल्या दयनिय अवस्थेत आहेत. या वर्गखोल्यांचे छत कवेलूंचे असून अनेक ठिकाणी कवेलू फुटलेले आहेत. तसेच लाकडे फाटे सडले व तुटलेले आहेत. केवळ तीन वर्ग थोड्या चांगल्या स्थितीत असून तेसुद्धा कवेलूंचेच आहेत.

सदर शाळेला एकूण ११ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. सध्या सहा जीर्ण वर्गखोल्या असून आणखी तीन नवीन वर्गखोल्यांची गरज आहे. शैक्षणिक आराखड्यानुसार दरवर्षी याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती तिरोडामार्फत जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षण विभागाला सादर करण्यात येते. मात्र शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे सदर शाळा नवीन इमारतीपासून वंचित आहे.

शालेय इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषदेला पत्र सादर करण्यात आले होते. २ आॅगस्ट २०१४ रोजी जि.प. गोंदियाचे इमारत धोकादायक असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. मात्र नवीन इमारतीचे काम कुठे अडले? हे गुलदस्त्यात आहे. सध्या या जीर्ण व धोकादायक इमारतीमध्येच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही बाब शासन व प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.