मेडिकल, अभियांत्रिकीसाठी ५ मे रोजी सीईटी

0
14

पुणे दि.५: : राज्य शासनाचे प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २0१६-१७ या शैक्षणिक वर्षातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या ५ मे रोजी ‘एमएचटी – सीईटी २0१६ ‘ परीक्षा घेतली जाणार आहे.
शासनाने चालू शैक्षणिक वर्षात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार येत्या ५ मे रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेबाबत व अर्ज विक्री संदर्भातील सविस्तर माहिती लवकरच कळविली जाणार आहे, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अभियांत्रिकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात
आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशासाठी सीबीएसईकडून घेतल्या जाणार्‍या जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. जेईई मेन्स परीक्षा येत्या ३ एप्रिल रोजी देशभरातील १२४ केंद्रांवर घेतली जाईल. राज्यातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे शहरांमधील केंद्रांवर परीक्षा देता येणार आहे. जेईई मेन्स परीक्षेतील पात्र दीड लाख विद्यार्थ्यांना जेईई अँडव्हान्स परीक्षा देता येईल.