शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

0
80

नागपूर : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे ठरवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ मेपर्यंत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र शैक्षणिक सत्र २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रातील शाळा करोना प्रादुर्भावामुळे बंद असल्याने शाळांना विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवता आली नाही. त्यामुळे सत्र २०२१-२२च्या संचमान्यतेत हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संचमान्यता ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंदणी असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत राज्यात आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८७ टक्के आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात यावे व ही संच मान्यता अंतिम झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ मेपर्यंत किंवा पूर्वी करावे, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले. मात्र शासनाने दोन वर्षे तरी संचमान्यता करून शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये व पटसंख्या वाढवण्याची संधी द्यावी, अशी मागणी शिक्षक भारती व भाजप शिक्षक आघाडीसह अन्य संघटनांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांत करोनाचा अतिशय मोठा फटका शाळांना बसला. बऱ्याच शाळा बंद असल्यामुळे हव्या त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवता आली नाही. त्यामुळे बऱ्याच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. तसेच आधार जुळणी होत नसल्याने बरेच विद्यार्थी शाळेत व पटावर प्रत्यक्ष उपस्थित असूनही संचमान्यतेमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरताहेत.

संचमान्यतेला विरोध..

करोनाकाळात शाळा बंद असल्याने शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. परिणामी, आता मोठय़ा प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका असल्याने संचमान्यतेला विरोध होत आहे.