डॉ.आंबेडकरच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून जि.प. शाळांत उन्हाळी शिबिर

0
14

गोंदिया : शहरी भागातील शाळांमध्ये ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जातात. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील जि.प.शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते १२ मे २0१६ या कालावधीत उन्हाळी शिबिर घेण्यात येत आहे.
शैक्षणिक सत्र २0१५-१६ नुसार एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर शाळा सुरु असूनही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी उन्हात इतरत्र फिरत असतात मात्र शाळेत येत नाहीत. ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये वातावरणात तापमान अधिक असून परिस्थिती प्रतिकूल असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही हाणिकारक असते. त्यामुळे या दिवसात विद्यार्थ्यांना जि.प. शाळांमध्ये सकाळी ७ ते ११वाजता या कालावधीत शारीरिक, बौध्दीक, कला, विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आरोग्य विषयक, व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने उन्हाळी शिबिर घेण्यात येत आहे.शिबिराच्या माध्यमातून वाचन-लेखन, संवाद, हस्ताक्षर सुधार, निर्णय क्षमता, निरीक्षण, कलाविष्कार, आत्मविश्‍वास आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणारे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. अभ्यासक्रमाची उजळणी, मैदानी खेळ (लगोरी, दौड, लांब व उंच उडी इत्यादी), बैठे खेळ (कॅरम, बुध्दीबळ, सापसिडी), विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता गाव पातळीवरील पारंपारिक कलाकौशल्य असणार्‍या अनुभवी व जाणकार व्यक्तींच्या माध्यमातून विविध कौशल्य प्रशिक्षण (बुरड काम, कुंभार काम, सुतार काम, चित्रकला, संगीत साहित्य वाद्य वादन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, कागदापासून  विविध वस्तू तयार करणे शिकविले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या ग्रंथालयातील पुस्तक, वृत्तपत्र, गाणी, गोष्टी, थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारीत बाल साहित्य इत्यादी मधून चर्चा घडवून आणली जाणार आहे. वकृत्व, गीत गायन, कथा-कथन या सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी पाणी बचत, विज बचत, वृक्ष संवर्धन व संगोपन याबाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित करणे यावर अधिकाधिक भर शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे.
ज्या शाळा डिजिटल आहेत अशा शाळांमध्ये अभ्यासक्रमावर व थोर महापुरूषांच्या जीवन चरित्रावर आधारीत माहितीपट दाखविण्यात येणार आहे. उन्हाची तिव्रता पाहता मुलांना आरोग्य विषयक माहिती परिसरातील डॉक्टर अथवा जाणकार व्यक्तींच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.