गोंदियाच्या सृष्टीची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

0
23
टर्की स्पेस एजन्सीचे अंतराळवीर तुवा अत्सवर, ब्लु ओरिजीनचे अंतराळवीर व्हीक्टर हेसपन्हा, युएईचे अंतराळवीर हजा अलमनसुरी यांच्यासह सृष्टी पाटील

● आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेसमध्ये केले सादरीकरण

दिल्ली :७४ वी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेस अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे नुकतीच पार पडली. यामध्ये जागतिक स्तरावरील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि अंतराळवीरांसह या क्षेत्रातील निवडक मान्यवर सहभागी झाले होते. २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत १०० हून अधिक देशांनी भाग घेतला होता. यामध्ये व्यवसायाने स्पेस मायक्रोबायोलॉजिस्ट असलेली मुळची गोंदियातील सृष्टी सुरेश पाटील या तरुणीने सहभाग नोंदवला. मंगळ ग्रहावर असलेल्या “ऑर्कस पटेरा” या ठिकाणाबद्दल तिने संशोधन केले आहे. ७४ व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेसच्या एका समितीने याविषयीचे तिचे संशोधन सादरीकरणासाठी निवडले. या परिषदेसाठी सृष्टीची झालेली निवड तिने केलेल्या संशोधनाचे महत्व अधोरेखित करते

या परिषदेदरम्यान इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ, चांद्रयान-३ मोहिमेचे सर्व शास्त्रज्ञ तसेच नासाचे मुख्य तंत्रज्ञ ए. सी. चरानिया, आयस्पेसचे संस्थापक ताकेशी हकामादा, मुख्य कार्य. अधिकारी ज्युलियन लामामी, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अध्यक्ष हिरोशी यामाकावा यांसह जगातील नामांकित विद्यापीठांचे अंतराळ तज्ञ, नासा आणि ब्लू ओरिजिनचे अंतराळवीर अशा प्रमुख व्यक्तींची देखील सृष्टी पाटील यांनी भेट घेतली. जैवविविधतेपासून मंगळावरील संशोधनापर्यंतचा प्रवासाची या सर्व मान्यवरांनी दखल घेऊन कौतुक केले.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्यासमवेत सृष्टी पाटील

काय आहे अंतराळवीर काँग्रेस?
आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेस ही एक जागतिक परिषद आहे. दरवर्षी या परिषदेचे आयोजन होत जागतिक स्तरावर होत असते. ही परिषद म्हणजे ‘अवकाश विज्ञान’ या विषयातील अभ्यासकांची एक वार्षिक बैठक आहे. या परिषदेत जागतिक स्तरावरील संशोधक, अभ्यासकांची व्याख्याने आणि चर्चासत्र होतात. यामध्ये अंतराळ आणि अवकाश संशोधन क्षेत्राशी संबंधित मान्यवर जगभरातुन सहभागी होतात.

कोण आहेत सृष्टी पाटील?
सृष्टी पाटील ह्या ऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रेलियन रिसर्चसॅट स्पेस संस्थेमध्ये स्पेस मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणुन काम करतात. सृष्टी पाटील मुळच्या गोंदिया जिल्ह्यातील असुन आई वडील गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सृष्टीने नागपूर विद्यापीठातून पर्यावरण विषयात पदवी संपादन केली आहे. तर पुणे विद्यापीठाशी संलग्नित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून जैवविविधतेमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तसेच अवकाश संशोधनासंबंधी विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत मंगळावरील एक वैशिष्ट्य असलेल्या ‘ऑर्कस पटेरा’ वरील संशोधन सादर करण्याची मला संधी मिळाली. दरम्यान माझ्या अनुभवातील सर्वात रोमांचक क्षणांपैकी एक म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना मी भेटले. मी माझा संशोधनाचा अनुभव त्यांना सांगितला. मला अवकाश क्षेत्रातील काही आणखी काही महत्वाच्या लोकांसोबतही संवाद साधण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. माझ्या पुढील संशोधनासाठी यया अनुभवाचा मोठा फायदा होईल.
– सृष्टी पाटील
स्पेस मायक्रोबायोओलॉजिस्ट