भंडारा जिल्ह्याचा निकाल ८४.0२ टक्के;हर्षदा परमारे जिल्ह्यात अव्वल

0
20

भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारी दुपारी ऑनलाईनद्वारे घोषित केला. जिल्ह्याचा निकाल ८४.0२ टक्के लागला. भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची हर्षदा यादवराव परमारे हीने ९८ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक सर्मथ विद्यालय लाखनीचा प्रज्योत राजेश गजभिये (९६.६0) तर तृतीय क्रमांक संयुक्तरीत्या नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचा चेतन पुस्तोडे व नुतन कन्या विद्यालयाची मृदुला उमलकर हिने प्राप्त केला. दोन विद्यार्थ्यांना ९६.४0 टक्के गुण मिळाले आहेत. निकालात नागपूर विभागातून चौथ्या स्थानावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी मुलींनी निकालात भरारी घेतली आहे. भंडारा जिल्ह्यात दहावीच्या २८६ शाळा आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २0,३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १0,२२६ मुले तर १00९५ मुलींनी परिक्षा दिली. यापैकी ८,३१६ मुले व ८,७५८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.३२ असून मुलींची टक्केवारी ८४.७६आहे. त्यात मुली ३.४४ टक्क्यांनी समोर आहेत. निकालात भंडारा जिल्ह्यातून लाखनी तालुका अव्वल तर तुमसर तालुका पिछाडीवर आहे.