कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करु – राज्यपाल रमेश बैस

0
2

सातारा दि. २३ :  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्याची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठवावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

या विद्यापीठाच्या कामकाज, अडीअडचणीबाबत महाबळेश्वर येथील राजभवनात राज्यपाल श्री. बैस यांनी आढावा घेतला. यावेळी राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल, विद्यापिठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, उपसचिव रविंद्र धुरजड आदी उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची (समूह विद्यापीठ) स्थापना ऑक्टोंबर 2021 मध्ये झाली आहे. रयत शिक्षण संस्था ही देशातील अत्यंत जुनी व मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेअंतर्गत सुमारे साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या समूह विद्यापीठाला शासनाने मंजुरी दिली असून समूह विद्यापीठांना मंजुरी देत असताना शासनाचे जे धोरण होते त्या प्रमाणे आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून उपलब्ध व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

यावेळी राज्यपालांनी विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असणाऱ्या करिअर संबंधित उपक्रम, स्किल ओरिएंटेड उपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांसाठी निर्माण होत असलेला रोजगार, नोकऱ्या यांचाही आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेमार्फत बेळगावमध्ये चालविण्यात येत असणाऱ्या शाळांबद्दलही राज्यपाल श्री. बैस यांनी जाणून घेतले.