जास्तीतजास्त शिक्षकांनी लाभ घ्यावा- डॉ. नरेश वैद्य, प्राचार्य डायट गोंदिया
गोंदिया,दि. 19: जर्मनीला नोकरी व रोजगारानिमित्त जाणाऱ्या कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकवण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गास, जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जि. प./ न. प) शाळातील इच्छुक शिक्षकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्याच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील जास्तीतजास्त शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आज घेतलेल्या पत्र परिषदेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) गोंदियाचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी केले आहे.
सविस्तर असे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत सामंजस्य करार दिनांक २५/२/२०२४ रोजी केला आहे. तसेच पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि. ११ जुलै, २०२४ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्वोथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मध्ये दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे राज्यात १०,००० विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. सदर प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ व संध्याकाळ) असे २०० प्रशिक्षण वर्ग राज्यात सुरु करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता BA in जर्मन/ MA in जर्मन व ग्योथे इन्स्टिट्यूट यांचे द्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A1, A2, B1, B2, C1, C2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित असून शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी
(https://forms.qle/1Q32ByNwp9MnHmHc7) ही गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. उपरोक्त लिंक वर शिक्षक नावनोंदणी करीत आहेत तथापि जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याने व्यापक लोकहितास्तव गोंदिया जिल्हा कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक शिक्षकांना उपरोक्त लिंक वर आपली नाव नोंदणी करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
तरी गोंदिया जिल्ह्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील (जि. प./ न.प) अधिकाधिक शिक्षकांनी (https://forms.qle/1Q32ByNwp9MnHmHc7) या लिंकवर आपली नावनोंदणी करावी. तसेच दि. ११ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यां महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी असेही प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी आवाहन केले आहे.