नवीन संचमान्यता विरोधात शिक्षक समिती 17 मार्च रोजी करणार आंदोलन

0
76

ग्रामीण भागातील शाळा वाचवायच्या असतील तर शिक्षक व समाज बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हा!—-जिल्हाध्यक्ष संदीप तिडके

गोंदिया-खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या शाळा वाचविण्यासाठी 17 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन व सत्याग्रह केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यता संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला व त्याची अंमलबजावणी शैक्षणिक सत्र 2024- 25 मध्ये करण्याचे ठरवले असून आताच प्रकाशित झालेल्या संचमान्यतेमध्ये हजारो पदे पदवीधर शिक्षकांची अतिरिक्त होत आहेत. राज्यात जवळपास वीस हजार शिक्षक अतिरिक्त होणार असून हजारो शाळांच्या तुकड्या तुटणार असून हजारो शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागातील डोंगर – पाड्यावरील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपल्या महापुरुषांनी खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाचे जाळे विणले.स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे 17 मार्च 2025 रोज सोमवारला राज्यव्यापी धरणे आंदोलन व सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे दुपारी 2.00 ते 5.00 पर्यंत धरणे व निदर्शने आंदोलन होणार आहे . या आंदोलनात जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे, मुख्यालयाची अट शिथिल करणे, विषय पदवीधर शिक्षकांना समान वेतनश्रेणी लावणे यासह जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विविध मागण्यांच्या अनुषंगाने धरणे आंदोलन केले जाणार आहे.तरी सामाजिक बांधिलकी जोपासून गोरगरिबांच्या शाळा वाचावन्याकरिता बहुसंख्येने शिक्षक बंधू – भगिनीं,सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच सर्व समाज बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांनी केले आहे.