23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक जि.प.प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांसाठी नंदनवनच:- लायकराम भेंडारकर

जि.प.प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांसाठी नंदनवनच:- लायकराम भेंडारकर

0
59

अर्जुनी-मोर.(सुरेंद्रकुमार ठवरे)-कुंभार जसा मातीला आकार देत विवीध प्रकारची भांडी बनवितो.तसेच प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना कुंभारापरी शिक्षक घडवितो.कारण प्राथमिक शिक्षणच शिक्षणाचा पाया आहे.माझे प्राथ.शिक्षण इंजोरीच्या याच शाळेत झाल्याने मला प्रचंड अभिमान आहे.मी कितीही मोठ्या पदावर गेलो तरी माझी नाळ गावासीच जोडली आहे.कोणत्याही सामाजीक उपक्रमाची सुरवात मी माझ्या गावातुन व शाळेतुनच करतो. त्यामुळे जि.प.प्राथमिक.शाळा ह्या विद्यार्थ्यांसाठी नंदनवनच आहेत.असे गौरवोद्गार गोंदिया जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी काढले.

इंजोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित (ता.30) करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन भेंडारकर बोलत होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाने उपस्थित ग्रामस्थांच्या मनात नवीन ऊर्जा व प्रेरणेचा संचार झाला.पुढे बोलतांना भेंडारकर म्हणाले की गावातील युवकांनी स्पर्धा परीक्षा, शिक्षण व अन्य क्षेत्रांत पुढे यावे, यासाठी प्रत्येकाने जिद्द व चिकाटीने प्रयत्न करावे. “आज माझ्या गावाची हीच शाळा ‘अटल क्रीडा महोत्सवा’मध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे, याचा मला अत्यंत अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना भेंडारकर म्हणाले की, “माझे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. माझे दोन्ही गुरुजी कौतुकास पात्र आहेत. आज या शाळेचा व गावाचा विकास त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला आहे.” गावातील लोकांचा शिक्षकांवर असलेला विश्वास हेच यशाचे गमक असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी रविंद्र खोटेले माजी सरपंच,मोरेश्वर मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रुपाली मेंढे उपाध्यक्षा शा. व्य. स, डाकराम मेंढे पोलीस पाटील, दिलीप हूकरे, सतीश शिवणकर,गायत्री मेंढे, दीपिका रहिले, मोनाली मेंढे, दिक्षा शेंडे, विद्या तरोने, अमिता बोंद्रे,रागिणी भेंडारकर, उषा खोटेले,अश्विनी तरोने, नितीन हुकरे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्ताविक मुख्याध्यापक विठोबा रोकडे यांनी केले.तसेच संचालन सहाय्यक शिक्षक लाखेश्वर लंजे यांनी उत्तमपणे पार पाडली.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, गीत आणि अभिनय याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करताच, ग्रामस्थांमध्येही अभिमानाची भावना जागृत केली.एकूणच, लायकराम भेंडारकर यांचे गावाशी असलेले नातं, त्यांची नम्रता आणि समाजासाठी असलेली बांधिलकी हे नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा नेतृत्वातूनच ग्रामीण भागाचा खरा विकास घडू शकतो.

blank