१८७ गावात ५८४ शाळाबाह्य व बालकामगार मुले

0
6

गोंदिया,berartimes.com दि.२१ : श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १८७ गावात ९ ते १३ आणि १४ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गावातील आशा सेविका व नेहरु युवा केंद्रातील समन्वयक यांच्यामार्फत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण ५८४ बाल कामगार व शाळाबाह्य मुले आढळून आली.
या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील १८७ गावांची निवड करण्यात आली होती. यात ९ ते १३ आणि १४ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३५ गावे, तिरोडा तालुक्यातील २३ गावे, आमगाव तालुक्यातील २१ गावे, सालेकसा तालुक्यातील ३१ गावे, देवरी तालुक्यातील २० गावे, गोरेगाव तालुका- १९ गावे व सडक/अर्जुनी तालुका- १६ गावे, तर अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला. या सर्वेक्षणात ९ ते १३ वयोगटातील २३२ आणि १४ ते १८ वयोगटातील ३५२ असे एकूण ५८४ शाळाबाह्य व बाल कामगार मुले सर्वेक्षणादरम्यान आढळून आली. त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता श्रम रोजगार मंत्रालयातर्फे ७ विशेष प्रशिक्षण केंद्र लवकरच उघडण्याबाबत अहवाल पाठविण्यात आला आहे.