25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home शैक्षणिक आश्रम शाळांतील शिक्षकांना मुख्य प्रवाहात आणा सदानंद मोरे यांचे आवाहन

आश्रम शाळांतील शिक्षकांना मुख्य प्रवाहात आणा सदानंद मोरे यांचे आवाहन

0
28

नागपूर : आदिवासी आश्रम शाळांतील शिक्षक आजही साहित्यविषयक चळवळीपासून लांब आहेत. त्यांच्या समस्या आपल्याला माहिती नाहीत. शिक्षक साहित्य संघाने त्यांना मुख्य प्रवाहात आणावे असे आवाहन ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
शिक्षक साहित्य संघाच्या नागपूर शाखेतर्फे बुधवार बाजार परिसरातील संताजी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित दोन दिवसीय पाचव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. त्यावेळी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, संघाच्या नागपूर विभागीय मंडळाचे सचिव श्रीराम चव्हाण, माजी शिक्षण संचालक नारायण जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे प्रमुख अतिथी होते.
आदिवासी आश्रम शाळांतील शिक्षक मुख्य प्रवाहापासून लांब असल्यामुळे अन्य हितसंबंधी लोक या परिस्थितीचा फायदा घेतात. साहित्यविषयक चळवळी या शिक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आगामी संमेलनाची माहिती त्यांना मिळावी यासाठी व्यवस्था करा. ते येथे आल्यास त्यांच्या समस्या कळतील. त्यांनाही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांच्याशिवाय साहित्य परिपूर्ण होऊ शकत नाही असे डॉ. मोरे यांनी सांगितले.
श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राज्य शासन व साहित्यिकांवर प्रहार केला. साहित्य, भाषा व संस्कृतीविषयी शासनाची भूमिका उदासीन आहे. यासाठी एक रुपयाचीही स्वतंत्र तरतूद केली जात नाही. साहित्यामुळे समाजाचा विकास होत नाही असे शासनाला वाटत असेल तर, ते चुकीचे आहे. साहित्यामुळे समाजावर संस्कार होतो. या संस्कारामुळेच कायदे पाळले जातात. परिणामी कायदा व सुव्यवस्थेवरील खर्चाची बचत होते. साहित्य हा मानवी विकासाचा मूलभूत घटक आहे. शासनाने साहित्य, भाषा व संस्कृतीला गंभीरतेने घ्यावे यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलन आयोजकांना निमंत्रित साहित्यिकांचे चोचले पुरवावे लागत असल्यामुळे खर्च वाढतो. निमंत्रित साहित्यिकांना मानधन, प्रवासाचा खर्च, गाड्या व राहण्यासाठी ३-स्टार हॉटेल हवे असते. असे असतानाही आपण साहित्य संमेलनाला पंढरी म्हणतो. पंढरपूरला जाणार्‍या कोणत्या वारकर्‍याचे एवढे चोचले असतात? असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला.
संवेदनशील शिक्षक आपले विचार साहित्याच्या माध्यमातून मांडतात असे मत डॉ. आगलावे यांनी व्यक्त केले. नारायण जोशी यांनी श्यामची आई पुस्तकाच्या स्मृती जपण्याचे तर, श्रीराम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमधील आकलन शक्ती व कल्पक वृत्तीला विकसित करण्याचे आवाहन शिक्षकांना केले. संघाचे संस्थापक-अध्यक्ष जयदीप सोनखासकर, विभागीय अध्यक्षा विजया मारोतकर, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.

blank