९७ केंद्रावर साडेबारा हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा

0
14

गोंदिया,दि.२५ : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी २६ रोजी गोंदिया जिल्ह्यातील ९७ केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेला इयत्ता पाचवी आणि आठवीचे १२ हजार ५५२ विद्यार्थी बसणार असून शिक्षण विभागाने त्यासंदर्भात तयारी पूर्ण केली. या परिक्षेत इयत्ता आठवीकरिता नियम घालून दिले आहेत. प्रश्नपत्रिकेत असलेल्या प्रश्नांमध्ये पर्याय नोंदवा, असे असलेल्या प्रश्नांमध्ये दोन अचूक पर्याय नोंदविणे आवश्यक आहे. त्याऐवजी केवळ एकच पर्याय नोंदविल्यास विद्यार्थ्याला शून्य गुण देण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद गोंदियांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवीकरिता ५२ परीक्षा केंद्र असून त्यावर ६ हजार ९१४ विद्यार्थी, तर इयत्ता आठवीचे ५ हजार ६३८ विद्यार्थी ४५ केंद्रावरून परीक्षा देणार आहेत. परीक्षा सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवीकरिता भाषा/गणित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी असे परीक्षेचे विषय असून याच प्रकारे इयत्ता आठवीचे देखील परीक्षेचे विषय राहणार असून ३00 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका राहणार आहेत.
आमगाव तालुक्यात पाचवीचे चार केंद्र असून ५४३ विद्यार्थी परीक्षा देतील, तर इयत्ता आठवीचे ४६२ विद्यार्थी तीन केंद्रावर परीक्षा देतील. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाचवीच्या ८१९ विद्यार्थ्यांकरिता ९, आणि आठवीच्या ५९७ विद्यार्थ्यांकरिता नऊ केंद्र आहेत. गोंदिया तालुक्यात १५ केंद्रावर पाचवीचे २२५0, तर १२ केंद्रावर इयत्ता आठवीचे २११७ विद्यार्थी परीक्षा देतील.
देवरी तालुक्यात प्राथमिक गटाकरिता चार केंद्र असून ६५७ विद्यार्थी परीक्षा देतील आणि आठवीचे ५८२ विद्यार्थी पाच केंद्रांवरून परीक्षा देतील. गोरेगाव तालुक्यात पाचवीचे ८८८ विद्यार्थी असून त्यांच्याकरिता चार केंद्र, तर आठवीच्या ६४८ विद्यार्थ्यांकरिता तीन केंद्र तयार करण्यात आले आहेत.
सडक अर्जुनी तालुक्यात पाचवीचे ६२0 विद्यार्थी असून त्यांच्याकरिता आठ, तर आठवीच्या ३८३ विद्यार्थ्यांकरिता आठ केंद्र तयार करण्यात आले आहेत. सालेकसा तालुक्यात आठवीचे ५१0 विद्यार्थ्यांकरिता पाच केंद्र, तर इयत्ता आठवीच्या ३५९ विद्यार्थ्यांसाठी तीन केंद्र आहेत. तिरोडा तालुक्यात तीन केंद्रावरून इयत्ता पाचवीचे ६२७, तर इयत्ता आठवीचे ४९0 विद्यार्थी दोन केंद्रांवर शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहेत.