तंत्रशिक्षण संचालनालयाची त्रिसदस्यीय समिती गठित

0
9

चंद्रपूर,दि.11: यंग इंजिनिअर्स एज्युकेशन सोसायटी कुरखेडाचे अध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा-चौगान फाट्याजवळ महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुरू करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे बनावट दस्तऐवज सादर केले होते. याप्रकरणी ब्रह्मपुरीच्या एसडीओंनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पिसे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. त्यामुळे या महाविद्यालयाची चौकशी होणार असून, संस्थाध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. सोबतच या महाविद्यालयाची मान्यताही रद्द होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.यासोबतच राज्यातील नव्या सर्वच अभियात्रिंकी महाविद्यालयाची सुध्दा चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील बेटाळा परिसरात यंग इंजिनिअर्स एज्युकेशन सोसायटी, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली या संस्थेकडून महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावाने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नागपुरातील विभागीय कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता.त्यावेळी संस्थाचालक देवेंद्र पिसे यांनी उपविभागीय अधिकार्‍यांची खोटी स्वाक्षरी व बनावट एन. ए. आदेश, तहसीलदारांचे बनावट प्रमाणपत्र, सातबारा उतारा, शिक्के वापरल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली. त्यानंतर या प्रकरणी ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे २४ मार्चला तक्रार करण्यात आली होती. तक्रारीवरून एसडीओंनी कागदपत्रांची तपासणी करून तहसीलदारांना अहवाल मागितल्यानंतर सर्व दस्तऐवज बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, एसडीओ उमेश काळे यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांविरोधात ८ एप्रिलला तक्रार दाखल केली. त्यावरून ब्रह्मपुरी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पिसे यांच्यावर गुन्हे दाखल करीत अटक केली. सध्या संस्थाध्यक्ष पिसे पोलीस कोठडीत असून, तंत्रशिक्षण संचालनालयानेही या प्रकरणाची दखल घेतल्याने संस्थाध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत.