नाडेकल जंगलात पोलीस-नक्षल चकमक

0
11

गडचिरोली,दि.11:जिल्ह्यातील कुरखेडा उपविभागातील कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणार्‍या नाडेकल गावाजवळील जंगल परिसरात रविवारी (९ एप्रिल) रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून रायफलसह मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
नाडेकल जंगल परिसरात पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ. महेश्‍वर रेड्डी व विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी साहित्य घटनास्थळीच टाकून अंधार व जंगलाचा फायदा घेत पळून गेले. चकमकीनंतर घटनास्थळावर शोधमोहीम राबविली असताना, एसएलआर रायफल, १२ बोर रायफल, एक एसएलआर मॅगझिन, १६ नग एसएलआर जिवंत काडतूस, दोन नग १२ बोर काडतुसे, एक क्लेमोर माइन्स, २ पिट्ट, लोखंडी खिळे, औषध व लिखित साहित्य तसेच दैनंदिन वापराचे नक्षल साहित्य आढळून आले. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.