बदली धोरणाच्या विरोधात शिक्षक संघाचा बुधवारी मोर्चा

0
12

गोंदिया,दि.23 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २७ फेबुवारी रोजी नविन बदली धोरणासंदर्भात निर्णय केला. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. या निर्णयात अनेक त्रूट्या आहेत. या निर्णयाचा विरोध आणि शिक्षकांच्या इतरमागण्यांच्या पुर्ततेसाठी २६ एप्रील रोजी दुपारी जिल्हापरिषदेसमोर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नागपूर विभागीय अध्यक्ष नुतन बांगरे यांनी केले.
मोर्च्यामध्ये प्रामुख्याने विविध मागण्या लावून धरण्यात येणार आहेत. त्यात प्रशासकीय बदल्या तालुक्याच्या तालुक्यात करण्यात याव्यात, विनंतीवरून किंवा स्वेच्छेने जे शिक्षक जाण्यास तयार आहेत. त्यांना बदली देण्यात यावी. अतिदुर्गम भागात दे शिक्षक स्वेच्छेने राहण्यास तयार आहेत. त्यांची बदली करण्यात येवू नये. राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी. राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा. जिल्हा परिषद आणि नगर परिषदेतील शाळांतील विद्युत बील जिल्हा परिषदेने भरावे. केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी. प्रसुती रजेवर असलेल्या शिक्षिकांच्या रजा कालावधीत हंगामी शिक्षकांची नियुक्ती करावी. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेला मुख्याध्यपक पद मान्य करण्यात यावे. विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनानुसार संगणक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय निर्गमित करून वसुली थांबवून वसुलीची परतफेड करण्यात यावी. अंतरजिल्हा बदली बाबत नवीन धोरण जाहीर करून आपसी, एकतर्फी व पती पत्नी एकत्रीकरण बदलीचे प्रस्ताव मान्य करण्यात यावे. विषय शिक्षकाना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करण्यात यावे. मार्च महिन्याच्या वेतनास विलंब करणाºयास तत्काळ निलंबितकरण्यात यावे. संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावून चर्चा करून अवघड व सामान्य क्षेत्र जाहिर करण्यात यावे. १ मे पासून शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या तत्काळ जाहिर करण्यात याव्यात. शालेय पोषण आहार इंधन भाजिपाला खर्च, स्वयंपाकी मानधन त्वरीत अदा करण्यात यावे. ४ टक्के सादिल अनुदान २७ जूनपूर्वी शाळांना वाटप करण्यात यावे, सडक अर्जुनी पंचायत समितीतील जीपीएफच्या अफरातफरीची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी. मार्च २०१४ पासून काही शिक्षकांच्या खात्यात जीपीएफची रक्कम जमा झाली नाही, ती त्वरीत जमा करण्यात यावी. एकस्तर पदोन्नतीवर फिक्सेसन करताना एक वेतनवाढ देवून एकस्तर देण्यात यावे. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके त्वरीत मंजूर करण्यात यावे. दर दोन महिन्यांनी संघटनेला शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकरिता पाचारण करण्यात यावे. १२ वर्षे पूर्ण झालेल्याशिक्षकांना वरिष्ट वेतनश्रेणी देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
पत्रपरिषदेला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नागपूर विभागीय प्रमुख नूतन बांगरे, गणेश चुटे, डी. पी. बोरकर, राजू गुनेवार, दुर्गाप्रसाद कोकोडे, गौरीशंकर खराबे, वाय. बी. पटले, अनिरूद्ध मेश्राम, सुधीर बाजपेयी, उमाशंकर पारधी, वाय. एस. भगत, यशोधरा सोनवाने, मंदा कावळे, नितू डहाट(दुर्गे), आमेश्वरी बिसेन आदींची उपस्थिती होती.

देवरीतील ३० शिक्षकांचा संघात पÑवेश
शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात २6 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या संबंधीची माहिती देण्याकरिता आज प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या विश्रामगृहात शिक्षक संघाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुर्वाश्रमिचे देवरी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या ३० शिक्षकांनी चेतन उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, प्रदेश कार्यकारिणीचे नुतन बांगरे यांच्या उपस्थितीत शिक्षक संघात प्रवेश केला.