गरीबी दूर करण्यात विज्ञानाचा महत्वाचा वाटा – नरेंद्र मोदी

0
17

मुंबई, दि. ३ – विज्ञानाचा गरीबी दूर करण्यात महत्वाचा वाटा असून त्याच्या सहाय्यानेच देशातील बेरोजगारी व गरिबी दूर करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आपल्या देशाची प्राथमिकता असली पाहिजे, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन समारंभादरम्यान ते बोलत होते. या समारंभात नोबेल पुरस्कार विजेत्यांचा मोदींच्या हस्ते गौरव करण्यात आला. ३ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडणा-या या मेळाव्यात देशविदेशातील सुमारे १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक सहभागी झाले आहेत.
यावेळी त्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वंसत गोवारीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या समारंभात सहभागी व्हायला मिळाल्याचा आपल्याला गर्व असल्याचे मोदींनी सांगितले. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी नेहमी विज्ञान व तंत्रज्ञान यांना प्राधान्य देत भारताला सक्षम करण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गार काढत मोदींनी नेहरूंचे कौतुक केले.
वैज्ञानिकांच्या कामामुळे आपण नेहमीच भारावून जातो असे सांगत विज्ञानामुळे माणसाचे अनेक प्रश्न सुटले असून मानवाचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडीत असल्याचे मोदी म्हणाले. विज्ञानाला कोणीतीही सीमारेषा नसते. देशाच्या विकासात विज्ञानाचा महत्वाचा वाटा आहे, त्यामुळेच आधुनिक भारताचे स्वप्न खरे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच देशातील संशोधकांमुळेच आपला देश अनेक बाबतीत प्रगतीपथावर असल्याचे सांगत त्यांनी सर्व संशोधकांचे कौतुकही केले. मात्र संशोधन करणं अधिक सोपं व्हायला हव असं सांगत संशोधनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विनाविलंब निधी मिळायला हवा असे ते म्हणाले. खासगी क्षेत्रांनीही संशोधनासाठी निधी द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘मानवी विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ ही या वेळच्या सायन्स काँग्रेसची थीम असून देशविदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक व ११ नोबेल लॉरेट या सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेमध्ये ३२ चर्चासत्रे आणि १४ परिसवांदांचे आयोजन करण्यात आले असून त्यात अ‍ॅग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री सायन्स, अ‍ॅनिमल, वेटर्नरी अँड फिशरी सायन्स, अ‍ॅन्थ्रोपॉलॉजी अँड बिहेवियर सायन्स, केमिकल सायन्स, अर्थ सिस्टीम सायन्स, इंजिनीअरिंग सायन्स, एन्व्हायर्नमेंट सायन्स, इन्फॉर्मेशन अ‍ॅन्ड कम्युनिकेशन सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, मटेरिअर सायन्स, मॅथेमेटिकल सायन्स, न्यू बॉयोलॉजी, फिजिकल सायन्स, प्लांट सायन्स असे १४ विभाग असणार आहेत.