शुल्कवाढीवरुन संतापलेल्या पालकांचा शिक्षणमंत्र्यांनाच घेराव

0
12
पुणे, दि. 12 – बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करणा-या शाळांवर काहीच कारवाई होत नसल्याने शुक्रवारी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुन्हा घेराव घेतला. यापार्श्वभूमीवर पुण्यातील भरमसाठ शुल्कवाढ करणा-या 18 शाळांचे व्यवस्थापन व पालक यांना सोमवारी सुनावणी मुंबईत बोलावण्यात आले असून यावेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विनोद तावडे पुण्यात आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर पालकांनी शुल्कवाढ प्रकरणी काहीच कारवाई झाली नसल्याचे तावडे यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना घेराव घातला. त्यानंतर तावडे यांनी सर्व पालकांशी चर्चा तासभर चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले.विनोद तावडे यांनी सांगितले, ‘शुल्कवाढी संदर्भात पुण्यातील 18 शाळांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांना सुनावणीसाठी मुंबईला बोलावण्यात आले आहे. या सुनावणीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. शाळांमधूनच पुस्तके व इतर शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाऊ नये याबाबतच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शाळांविरोधात ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे’.