शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने होणार

0
14

मुंबई दि.३१: अनुदानित, अनुदानपात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीद्वारे होईल. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत शाळा व्यवस्थापनांच्या अधिकारावर गदा आली आहे. या निर्णयाने खासगी व सरकारी अनुदानित शाळांमधील भरतीतील गैरप्रकारांना आळा बसेल व भरती गुणवत्तेच्या आधारावर होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

भरतीतील गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. उच्च न्यायालयानेही गुणवत्तेच्या आधारे भरतीचे आदेश दिले होते. त्यामुळे शासनाकडून ज्यांना वेतन मिळते, अशा शाळांतील भरती केंद्रीय पद्धतीने होईल. या परीक्षेत उत्तीर्ण शिक्षकांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. पारदर्शी पद्धतीने हे करण्यासाठी वेब पोर्टलद्वारे व वृत्तपत्रांतून शिक्षकांच्या रिक्त जागा नमूद करण्यात येतील. पात्र उमेदवार आॅनलाइन अर्ज करू शकतील.

राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अधिक गुणवत्ताधारक शिक्षक उपलब्ध होऊ शकतील. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. गेली अनेक वर्षे भरतीमधील होणारा कथित भ्रष्टाचार बंद होऊ शकेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. सदर परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे सदर परीक्षा यंत्रणेकडून निश्चित करण्यात येतील. परीक्षा आॅनलाइन घेण्यात येईल. हा निर्णय स्वयंअर्थसाहाय्यित व खासगी विनाअनुदानित शाळांना लागू राहणार नाही.