आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शुल्क माफ

0
12

नागपूर,दि.08 : राज्यभरात शेतकरी आंदोलन तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करणार असून याबाबत व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनंतर अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या अद्यापही थांबलेली नाही. आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांची मुले विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना विविध अडीअडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतर्फे होत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्यावतीने याबाबत कुलगुरूंना मागील आठवड्यात निवेदनदेखील देण्यात आले होते.

याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता आम्ही या मुद्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यात येईल. जर एखादा विद्यार्थी विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात शिक्षण घेत असेल तर त्याचे सर्व शुल्क माफ करण्यात येईल, अशी त्यांनी माहिती दिली.