बोडीत मृतावस्थेत आढळला भगवंतराव आश्रमशाळेचा विद्यार्थी

0
7

गडचिरोली,दि.२९: मुलचेरा येथील भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बारावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह बोडीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. प्रदीप व्यंकटेश तोरे(१८)रा.बोटलाचेरु असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.प्रदीप तोरे याने काल मुलचेरा येथील बाजारातून कपडे विकत घेतले आणि त्यानंतर दुपारी ३ वाजतापासून तो बेपत्ता झाला. परंतु शाळा प्रशासनाने याबाबतची माहिती प्रदीपच्या कुटुंबीयांना दिली नाही किंवा पोलिसांतही तक्रार केली नाही. आज सकाळी आश्रमशाळेच्या मागे असलेल्या बोडीत त्याचा मृतदेह आढळून आला. प्रदीपच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेऊन हंबरडा फोडला. प्रदीपचे डोके व पाठीवर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे मुलचेऱ्यात तणाव निर्माण झाला असून, शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक श्री.पाठक घटनास्थळी पोहचले आहेत.