रेल्वे प्रकरण-वडसा रेल्वेस्टेशनचे सहायक स्टेशनमास्टर निलंबित

0
11

देसाईगंज, दि.२९: येथील कब्रस्तानजीकच्या रस्त्यावर असलेले रेल्वे फाटक बंद न होताही रुळावरुन रेल्वे धावल्याने नागरिकांमध्ये काही क्षण धडकी भरली होती. मात्र, पांथस्थांनी प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अपघात टळला. ही घटना काल(दि.२८) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रेल्वेने देसाईगंजचे सहायक स्टेशन मास्टर रितेशकुमार यांना तत्काळ निलंबित केले आहे.

देसाईगंज येथे रेल्वेचे इंग्रजकालीन जंक्शन आहे. रेल्वे स्थानकापूर्वी काही अंतरावर कब्रस्तानजवळून एक बायपास रस्ता गेलेला आहे. हा रस्ता वहिवाटीचा असल्याने येथे रेल्वे फाटक लावण्यात आले आहे. काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-गोंदिया रेल्वे येण्याची वेळ येऊन ठेपली होती. परंतु फाटक बंद झाले नाही. रात्रीची वेळ असल्याने नागरिक ये-जा करण्यात व्यस्त होते. रेल्वे अगदी जवळ येताच लोकांमध्ये धडकी भरली. ते स्वत:ला सावरुन फाटकापूर्वीच थांबले. एवढयात रेल्वे सुसाट वेगाने तेथून निघून गेली. मालवाहू ट्रक, ट्रॅक्टर व अन्य मोठ्या वाहनांची वर्दळ असती तर मोठा अपघात झाला असता. परंतु तो टळला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, फाटकावर तैनात कर्मचारी गोष्टी करण्यात ‘तल्लीन’ होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच देसाईगंज रेल्वे विभागाने उत्तर दिले आहे. फाटकात तांत्रिक बिघाड होता व त्याची पूर्वकल्पना गाडी चालकास देण्यात आली होती. त्यामुळे सावधानतेच्या सर्व बाबी सांभाळून गाडी पास करण्यात आली, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकाराचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने वडसा रेल्वेस्टेशनचे सहायक स्टेशनमास्टर श्री.रितेश कुमार यांना निलंबित केले आहे.