कुऱ्हाडीत मातामृत्यू झालेल्या घरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट

0
30

गोरेगाव ,दि.२९ : गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील ललिता भुमेश्वर पंधरे (वय २२) या ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा १५ सप्टेबर रोजी केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मातामृत्यू झालेल्या घरी कुऱ्हाडी येथे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी २८ सप्टेबर रोजी भेट दिली. तिच्या पती व सासूकडून गर्भवती असतांनाच्या काळात कशाप्रकारे आहार देण्यात येवून काळजी घेण्यात आली याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्हाधिकारी काळे यांच्या भेटीप्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी.पाचे, कुऱ्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देव चांदेवार, डॉ.किर्तीकुमार चुलपार प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शुन्य माता व बालमृत्यू अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश कोणत्याही गर्भवती महिलेचा बाळंतपणा दरम्यान मृत्यू होवू नये तसेच जन्माला येणाऱ्या बालकांचा देखील मृत्यू होवू नये हा आहे. सर्व बाळंतपणे ही आरोग्य संस्थेतच झाली पाहिजे. घरी सर्व कामे महिला करीत असतांना बाळंतपणाच्या काळात महिलांची घरच्या पुरुष मंडळींनी योग्य काळजी घेतली पाहिजे तसेच तिच्या आहाराकडे देखील लक्ष दिले पाहिजे. बाळंतपणाच्या काळात घरची पुरुष मंडळी त्या महिलेच्या आरोग्याकडे लक्ष देतात की नाही यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व प्रत्येक गावात प्रत्येक महिन्याला निश्तिच केलेल्या दिवशी पती किंवा सासऱ्यांची सभा आयोजित करण्यात येत आहे. या सभा घेण्यामागचा उद्देश माता व बालमृत्यू टाळणे हाच आहे.
कुऱ्हाडी येथील माता मृत्यू झालेल्या ललिता पंधरे यांची प्रकृती ज्या दिवशी अचानक बिघडली त्या दिवशी तिला कुऱ्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे तिला गोंदिया येथील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात भरती करण्यासाठी नेले असता तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दोनदा परत केल्याची माहिती मयत महिलेचे पती भूमेश्वर पंधरे व सासू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
२४ व २८ ऑगस्ट रोजी गर्भवती महिलेच्या घरच्या मंडळीसाठी आयोजित सभेत आपण गेलो होतो असे भूमेश्वरने यावेळी सांगितले. सभेत वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य मार्गदर्शन केले. बाळंतपणाच्या वेळी पत्नीचे वजन ४१ किलो होते. ३ व ५ ऑगस्टला बाई गंगाबाई रुग्णालयातून परत पाठविल्याचे त्याने सांगितले. पुढील उपचारासाठी नागपूरला नेले. घरी परिस्थिती हलाखीची असतांना सुध्दा नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले. औषधी, इंजेक्शनसुध्दा तेथे बाहेरुनच खरेदी करुन आणावे लागत असल्यामुळे दररोज १५०० रुपये खर्च व्हायचा. जवळपास १३ दिवस तिथे ठेवले. पैसा संपल्यामुळे परत गोंदियाला केटिएसमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगडे यांना सूचना केली की, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा अडचणीच्या प्रसंगी तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची मदत घ्यावी. गर्भवती महिलांच्या घरी आरोग्य कर्मचारी नियमीत भेट देतील, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतील. एकीकडे शासन आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देत असतांना बाळंतपणाच्या काळात मातामृत्यू झालेल्या कुटूंबाला एवढा खर्च कसा आला असेल याचा शोध घेणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले. मातामृत्यू झालेल्या या महिलेचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.