गोंदियाच्या निशा खोटेलेला मिळणार 16 पदकं

0
19

नागपूर,दि.01ः-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४वा दीक्षांत समारंभ रविवारी होत असून या समारंभात साहिल श्याम देवानी या विद्यार्थ्याला सर्वाधिक २० पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. कादेरा तालीब शेख (जुल्फी) यांना मराठीत आणि डॉ. मालती साखरे यांना पाली या विषयात सर्वोच्च डी.लिट. ही पदवी देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे.,धोटे बंधू विज्ञान कॉलेज गोंदिया येथील निशा देवानंद खोटेले हिने बीसीएससी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल तिला १६ पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे,अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ यंदा रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहात होत आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करतील. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी व कुलगुरू गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व पारितोषिके प्रदान करणार आहेत. दीक्षांत समारंभात तब्बल ७६९ विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांमधील आचार्य पदवीने सन्मानित केले जाणार आहे. उन्हाळी परीक्षेत पास झालेल्या ५७ हजार २५९ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदवी प्रदान केली जाईल. त्यासोबतच विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या १६९ विद्यार्थ्यांना २९६ सुवर्ण पदके, ४२ रौप्य पदके तसेच शंभर अशी एकूण ४३८ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. नागपूर विद्यापीठातून वैद्यक शाखा नाशिक येथील वैद्यकीय विद्यापीठाला हस्तांतरित झाल्यानंतर पहिल्यांदाच तब्बल २० पदके व पारितोषिके अॅड. साहिल देवानी यांनी पटकाविली आहेत. जी. एच. रायसोनी कॉलजमधून विधी पदवीधर असलेला साहिल देवानी हा शहरातील प्रख्यात वकील श्याम देवानी यांचा मुलगा आहे. साहिल याच्या २० पदकांमध्ये १३ सुवर्ण पदके, चार रौप्य पदके आणि तीन पारितोषिकांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी कॉलेजमधील शीतल वासनिक हिला १४ पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.