पदवीधर मतदार नोंदणीला मुदतवाढ

0
7

नागपूर,दि.4ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीधर मतदारसंघातील दहा जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार असून पदवीधर मतदारांची ऑनलाइन नोंदणीसाठी आता सात डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर ११ डिसेंबरपर्यंत नोंदणीची प्रत सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आतापर्यंत सुमारे ३५०० पदवीधरांची मतदार म्हणून नोंद झालेली आहे. मतदार नोंदणीसाठी शनिवारपर्यंतची मुदत होती. त्याला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना केली होती. त्या मागणीला मान्य करून कुलगुरूंनी पदवीधर निवडणुकीच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करता मुदतवाढ जाहिर केली आहे. त्यानुसार सात डिसेंबरपर्यंत ऑनलाइन व त्याची प्रत ११ डिसेंबरपर्यंत सादर करायची आहे.सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीनंतर संघटनांना आता पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत सेक्युलर पॅनल, अभाविप, यंग टीचर्स असोसिएशन, शिक्षण मंच, विद्यार्थी संग्राम परिषद यासारख्या संघटनांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.