भंडाऱ्यातील ‘ब्रेनडेड’व्यक्तीकडून तिघांना जीवनदान

0
14

नागपूर,दि.4 : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. गेल्या रविवारी एका ‘ब्रेनडेड’ युवकाकडून अवयव दान झाले असताना रविवारी एका ४७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. या व्यक्तीचे यकृत मुंबई येथे तर दोन्ही मूत्रपिंड नागपूरच्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयातील गरजू रुग्णांना देण्यात आली.
नेल्लोर रहिवासी मदूरु श्रीनिवासुलू (४७) असे त्या ब्रेनडेड (मेंदूमृत) व्यक्तीचे नाव. मदूरू हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर होते. भंडाऱ्यातील एका कंपनीला ते संचालित करीत होते. १९ नोव्हेंबर रोजी त्यांना पक्षाघात झाला. त्यांना तत्काळ न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु ते ‘ब्रेनडेड’ झाले. त्यांना श्रीलता आणि विजया दोन पत्नी होत्या. या दोघींना आणि त्यांच्या मुलांना न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी अवयवदानाची माहिती दिली. त्या दु:खातही कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. २ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले. नेफ्रोलॉजिस्ट व मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शिवनारायण आचार्य यांनी यात मदत केली. विभागीय प्रत्यारोपण समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. मदूरु श्रीनिवासुलू यांचे यकृत औरंगाबाद येथील एमजीएम औरंगाबाद इस्पितळाच्या एका रुग्णाला दिले जाणार होते. डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. राजेश सोनी, डॉ. संदीप देशमुख, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. एस.जे. आचार्य आदींनी अवयव काढण्यास सुरूवात केली. एक मूत्रपिंड आॅरेंज सिटी हॉस्पिटलमधील २६ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील ४७ वर्षीय महिला रुग्णाला देण्यात आले.