गोंदिया,दि.७ : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून, भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन करुन घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
वसतिगृहामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांस किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहे. या योजनेसाठी निवड करतांना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. महानगरपालिका/ नगरपालिका/एमएमआरडीए/पीएमआरडीए/एनआयटी यासारख्या प्राधिकरणाच्या हद्दीपासून २० किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी देखील योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असतील.
अर्जाचा विहित नमूना https://sjsa.maharashtra.gov.in तसेच https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जाना नमूना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढले आहे त्या जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे तसेच टपालाद्वारे [email protected] या ई-मेलवर देखील ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावे. अपूर्ण असलेले व आवश्यक कागदपत्र नसलेले अर्ज रद्द समजण्यात येईल. ५० टक्केपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के असेल. निवड यादी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात प्रसिध्द करण्यात येईल. अर्ज भरण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर असल्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी कळविले आहे.





