गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा वर्ग

0
4

तुमसर – बपेरा-आंबागड जिल्हा परिषद शाळेला नियमित शिक्षक देण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने बुधवारी पंचायत समितीवर धडक देऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा वर्ग भरविण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी शिक्षक देण्याची मागणी केली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसांत केली.

बपेरा-आंबागड येथील दोन शिक्षकी शाळेत एक ते चार वर्ग असून, 42 विद्यार्थी आहेत. येथील शिक्षक ए. डी. वासनिक वैद्यकीय रजेवर आहेत. तर, शिक्षिका पी. बी. कापसे वेळेवर शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या संबंधी सरपंच वनिता भिवगडे, उपसरपंच ईश्‍वरदयाल बंधाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपसभापती सुरेश दमाहे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 13 जानेवारीला विद्यार्थ्यांनी पंचायत समितीवर धडक देऊन शिक्षकाची मागणी केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी 15 दिवसांत पर्यायी व्यवस्था करू, असे आश्‍वासन दिले. त्यानुसार आंबागड शाळेत एका शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती केली गेली. मात्र, मुदत संपल्याने ते मूळ ठिकाणी रुजू झाले. त्यामुळे संतप्त पालकांनी बुधवारी 19 विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले आणि प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा वर्ग भरल्याने काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांकडे तक्रार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

शिक्षक नसताना शालेय पोषण आहार शिजविणारी महिला अध्यापनाचे कार्य करीत आहे. या संबंधी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी यांना भेटून तक्रार करण्यात आली. लगेच मानधन तत्त्वावर पर्यायी शिक्षक नियुक्त करण्याचे आदेश विषय समितीला देण्यात आले. शाळा परिसरात जमिनीला समांतर विहीर आहे. या विहिरीमुळे केव्हाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. एकाच शिक्षकास शिकविण्यासह विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे शक्‍य नाही. त्यामुळे आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.