गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेला पत्रकारांना बसण्याची परवानगी

0
16

सिनेट सदस्या प्रा.संध्या येलेकरांचा मुद्दा

गडचिरोली,दि.17ः- गोंडवाना विद्यापीठ विकासाच्या प्रक्रियेत पत्रकार चांगली भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध विकासात्मक व इतर बाबींचे वृत्त संकलन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेच्या सभेत पत्रकारांना बसू देण्यात यावे, असा मुद्दा सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी बैठकीत उपस्थित करून तसा प्रस्ताव ठेवला. यावर सदर प्रश्न सभा अध्यक्षांनी मान्य केला. विद्यापीठाच्या निर्देशानुसार, पत्रकारांना सभेमध्ये बोलाविण्याचे निर्देश नाहीत. मात्र पत्रकारांना सभेमध्ये यायचे असल्यास ते येऊ शकतात, असे उत्तर सभाध्यक्षांनी दिले.गोंडवाना विद्यापीठाची  अधिसभा कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी रात्री उशीरापर्यंत पार पडली.

सदर मुद्यावर या अधिसभेत जमीन खरेदीच्या गैरव्यवहार प्रकरणावर बराच वेळ चर्चा झाल्यामुळे ही सभा लांबली. त्यामुळे जमीन खरेदी गैरव्यवहाराची चौकशी आता पाच सदस्यीय समितीमार्फत करण्यात येणार आहे.सिनेट सदस्य गोविंद भेंडारकर यांनी अंधश्रध्देवरील विषय अभ्यासक्रमात सुरु करण्याचा विषय ठेवला. विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ इमारत व इतर विकासात्मक कामे करण्यासाठी आरमोरी मार्गावरील अडपल्ली नजीक ४.१५ हेक्टर जमीन खरेदी केली. या खरेदीवर काही सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन मंडळातील सदस्यांचा आक्षेप आहे. या जमीन खरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. महामार्गालगतच्या व दूरच्या जमिनीला सारखाच भाव देण्यात आल्याचे मुख्य कारण आहे. रस्त्यालगतची जमीन व त्याच्या मागील जमिनीचा भाव सारखाच कसा असू शकतो, असा प्रश्न सिनेट सदस्य प्रा. प्रमोद शंभरकर यांच्यासह शिक्षण मंच व अभाविपच्या अनेक सिनेट सदस्यांनी या अधिसभेत उपस्थित केला. दरम्यान या मुद्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये आमदार डॉ. देवराव होळी, सिनेट सदस्य डॉ. प्रमोद शंभरकर, गोविंद सारडा, देवेश कांबळे व अजय बदकमवार यांचा समावेश आहे. आता ही समिती जमीन खरेदी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून विद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे.
याशिवाय प्रश्नपत्रिका मूल्यांकनाच्या कामासाठी बंद केलेला वाहन भत्ता सुरू करण्यात यावा, प्रत्येक विषयाचा प्रश्नकोष तयार करावा, स्वतंत्र आदिवासी साहित्य व गोंडी भाषा अभ्यास तसेच संशोधन केंद्र सुरू करावे, आदी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.