प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण

0
10

डिजीटल लाँचिंग पद्धतीने होणार समारंभ
वाशिम, दि. ०१ : केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली (ता. मंगरूळपीर) येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी १८ कोटी २५ रुपये अनुदान सुध्दा मंजूर केले आहे. या महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजीटल लाँचिंग पद्धतीने रविवार, ३ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम होत आहे.
याप्रसंगी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री तथा वाशिमचे सहपालकमंत्री मदन येरावार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार राज्य सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालयाचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात विविध कौशल्य विकासाच्या दृष्टीने हे महाविद्यालय वाशिम जिल्ह्यासाठी एक उपलब्धी ठरणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून विविध विषय व अभ्यासक्रमाचा समावेश अपेक्षित असून याचा फायदा आकांक्षित जिल्हा असलेल्या वाशिमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.