शिक्षण विस्तार अधिकार्‍याला विदेशवारीची मेजवानी!

0
19

चंद्रपूर,दि.26ः-कोरपणा तालुक्यातील शिवाजी इंग्लिश मीडियम शाळेचे आरटीई प्रकरण सतत चर्चेत असून, आता शाळेद्वारे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र लामगे यांना सिंगापूरवारीची मेजवानी दिल्याचा सनसनाटी खेज आरोप तक्रारकर्ते नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांनी केला. शासकीय कर्मचारी असल्याने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन विदेशवारी केली आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याने चौकशीची मागणी केली आहेत.
तालुक्यातील नांदा फाटा येथील नामांकित शाळा म्हणून श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलची ओळख आहे. नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुनोत यांनी शिवाजी इंग्लिश मीडियम शाळेचा आरटीई घोटाळा उघडकीस आणला. मागील ७ वर्षांपासून शाळेद्वारे विद्यार्थ्यांची व पालकांची होणारी लूट मुनोत यांच्यामुळे थांबली. सन २0१२-१३ ते सन २0१६-१७ या ५ वर्षांच्या कालावधीत शाळेद्वारे आरटीईत शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडून पूर्ण शिक्षण शुल्क वसुलण्यात आले. सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड आरटीईअंतर्गत झाल्याचे सांगून त्यांचेकडून २५ टक्के रक्कम म्हणजेच ३000 ते ३५00 शिक्षण शुल्क आकारण्यात आले. सदर प्रकरणाची सर्व पुराव्यानिशी तक्रार माहे ऑगस्ट २0१८ मध्ये शिक्षण विभाग कोरपणाकडे करण्यात आली.
शिक्षण विभागाद्वारे प्रकरणात दोनदा चौकशी करण्यात आली. दोन्ही वेळा शिवाजी शाळेला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. शिक्षण विभागाद्वारे दोन्हीदा फक्त सन २0१७-१८ व सन २0१८-१९ याच आर्थिक वर्षातील चौकशी केली असल्याने मुनोत यांनी आरटीई कायदा लागू झाल्यापासून सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याबाबत व शाळेवर नियमान्वये कारवाई करण्याबाबतचा तगादा लावला. या उपरांत सुद्धा गटशिक्षण अधिकार्‍यांनी अजूनपयर्ंत सखोल चौकशी केलेली नसल्याचे दिसते . याच शाळेद्वारे माहे मे २0१८ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र लामगे यांना शाळेच्या कर्मचार्‍यांसोबत सिंगापूरवारी मेजवानी म्हणून दिली असल्याचा सनसनीखेज आरोप तक्रारकर्त्यांनी केलेला आहेत.
कोणत्याही शासकीय कर्मचार्‍याला विदेशात जायचे असल्यास त्याला त्याच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक असते. परंतु, रवींद्र लामगे यांनी कुठलीही शासन परवानगी घेतली नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शिवाजी शाळेवरील विशेष प्रेमामुळेच शिक्षण विभाग शाळेला वाचविण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना ? असा खोचक सवाल काही पालकांनी केलेला असून, संपूर्ण प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी होऊन न्याय मिळणे गरजेचे आहे.