रेतीघाटावरुन सहा ट्रकसह जेसीबी जप्त

0
13

मोहाडी,दि.26ः-रोहा रेती घाटावरून अवैध रेती वाहून नेणार्‍या सहा ट्रक व एका जेसीबीवर जिल्हा खनिकर्म अधिकारी नेताम यांनी कारवाई केली. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून, सदर ट्रक व जेसीबी पोलिस मुख्यालय भंडारा येथे ठेवण्यात आले आहेत.खनिकर्म अधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी बेटाळा रेती घाटावर भंडारा पोलिसांसोबत मिळून कारवाई केली होती व तेथे कारवाईदरम्यान अंगावर कार चालविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यावेळी एकाही रेती भरलेल्या टिप्परवर कारवाई झालेली नव्हती. मंगळवारी रात्री रोहा रेती घाटावर धाड टाकण्यात आली. अवैध रेती वाहून नेणार्‍या सहा ट्रकवर व एक जेसीबीवर कारवाई करण्यात आली. यासाठी प्रचंड मोठा पोलिस ताफा, जिल्हा खनिकर्म अधिकारी व चमू, तहसील कार्यालय मोहाडीचे भरारी पथक, मोहाडीचे ठाणेदार शिवाजी कदम, पोलिस हवालदार विनोद सेलोकर, पवन राऊत, मिताराम मेश्राम उपस्थित होते. आरोपी रोहा वैनगंगा नदीघाटावरील स्मशानभूमी पात्रात साठवून ठेवलेली २९३ ब्रास रेती ट्रकमध्ये भरून वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून १२ लाख ३५ हजार २00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.