२० ऑगस्टच्या संपात शिक्षक भारती उतरणार

0
13

मुंबई,दि.१:-सर्वांना जुनी पेन्शन लागू करा, १०० टक्के अनुदान द्या, २ लाख रिक्त पदे त्वरीत भरा, शिक्षक, शिक्षेकतरांचे पगार व भत्ते संकटात टाकणारी ४ जुलै २०१९ ची अधिसूचना रद्द करा आदि मागण्यांसाठी दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी होणाऱ्या राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक संपात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होतील, अशी घोषणा शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केली आहे.

अंशदायी पेन्शन योजना बंद करुन सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करा, शासकीय-निमशासकीय- शिक्षक – शिक्षकेतर आस्थापनेतील २ लाख रिक्त पदे त्वरीत भरा, सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान सुरु करा, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती सुरु करा, सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा, शिक्षक, शिक्षेकतरांचे पगार व भत्ते संकटात टाकणारी ४ जुलै २०१९ ची अधिसूचना रद्द करा, बक्षी समितीचा खंड २ तातडीने प्रसिद्ध करा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा, रात्रशाळा संकटात टाकणारा १७ मे २०१७ चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय मागे घ्या, वस्तीशाळा शिक्षक आणि अप्रशिक्षित शिक्षण सेवक यांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरा, २० पटाच्या आतील शाळा बंद करु नयेत, अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्वच शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा, संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरु करा, वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट लागू करा, आयटी विषय शिक्षकांना वेतन मंजूर करा, सावित्रीबाई फुले – फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा द्या, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा अशा प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार केल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.

दि. २८ जुलै २०१९ रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुढाकाराने सरकारी, निमसरकारी शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक मुंबई येथे झाली होती. या बैठकीत राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महामंडळांसह विविध ६४ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सरकारच्या शिक्षण व शिक्षक विरोधी धोरणांचा विरोध करत २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या संपात शिक्षक भारती सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

मुंबईसह राज्यातील सर्व जिल्हा, तालुक्यातील शिक्षक भारतीचे पदाधिकारी शाळा, महाविद्यालयात सभा घेऊन २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या लाक्षणिक संपाबाबत माहिती देणार आहेत. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार तयारी करावी, असे आवाहन शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केले आहे.