शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणदूत बनून काम करावे !

0
13
  • २८ हजार शालेय विद्यार्थांना होणार कापडी पिशव्यांचे वाटप
  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व माविमचा उपक्रम
  • बचत गटांच्या महिलांनी शिवलेल्या कापडी पिशव्या

वाशिम, दि. २२ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यावतीने जिल्ह्यातील नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या २८ विद्यार्थ्यांना कापडी पिशवीचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज येथील नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालयातून झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले होते. शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणदूत बनून प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमरावती प्रादेशिक अधिकारी श्री. कारणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, माविमचे जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे, सहाय्यक समन्वयक समीर देशमुख, गटशिक्षणाधिकारी श्री. शिंदे, मुख्याध्यापक चंद्रकांत वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी शिवलेल्या कापडी पिशव्या विद्यार्थ्यांना वितरीत केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना कापडी पिशव्यांचे महत्व पटवून देवून प्लास्टिकच्या वापरला आळा घातला जाणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी श्री. इंगोले म्हणाले, शासनाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्वांनी कापडी पिशव्यांचा वापर करणे आवश्यक आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कापडी पिशव्या वापरण्यासाठी आग्रह धरावा.श्री. मानकर म्हणाले, प्लास्टिकच्या वापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे राज्य शासनाने प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये प्लास्टिकच्या वापरला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत. पालकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगून कापडी पिशव्यांच्या वापर करण्याबाबत सांगावे.

श्री. कारणकर म्हणाले, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निसर्गाचे चक्र बिघडले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. कापडी पिशवीचे महत्व पालकांना समजावून सांगावे.श्री. नागपुरे यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वितरण उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच प्लास्टिक बंदीची माहिती घरोघरी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणदूत म्हणून काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कमर्चारी, माविमचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.