राज्यातील शाळांचा आता पाच दिवसांचा आठवडा

0
23
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – विद्यार्थी आणि पालकांसाठी गुड न्यूज. राज्यातल्या शाळा या पुढे केवळ पाच दिवस सुरू ठेवल्या जाणार आहेत. शाळांना पाच दिवसांचा आठवडा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगत राज्याच्या शिक्षण सचिवांनी यासंबंधीची कार्यवाही करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांना आदेशही दिले आहेत.
लोकभारतीचे अध्यक्ष, मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज मंत्रालयात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेतली; तेव्हा शाळांना पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीवर शिक्षण सचिवांनी हा निर्णय घेतला.

शाळेच्या आणि अभ्यासाच्या ताणातून मुलांची सुटका झाली पाहिजे आणि शनिवार, रविवार दोन दिवसांची सुटी मिळाली पाहिजे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती. यात शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) कोणतीही अडचण येत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले होते. “आरटीई‘ आणि शासन निर्णयात कोणतीही बाधा येत नसल्याने “पाच दिवस शाळा चालविण्यास आडकाठी न करता आवश्‍यक ती कार्यवाही करण्यात यावी,‘ असे लेखी आदेशच शिक्षण सचिवांनी पाठवले आहेत.

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनेक शाळा आधीपासूनच पाच दिवसांच्या आठवड्याने चालतात. उर्वरित शाळा शनिवारी अर्ध वेळ चालतात. शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानस शास्त्रज्ञांच्या मते आठवड्यात किमान दोन दिवस मुलांना सुटी देणे आवश्‍यक आहे. शहरांमधील शाळांमध्ये दुरून येणाऱ्या शिक्षकांवरही प्रवास आणि बदलत्या शिक्षणक्रमाचा ताण लक्षात घेता “आरटीई‘नेच अपेक्षा केल्याप्रमाणे शिक्षकांना तयारीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांनाही शनिवार, रविवारी उसंत देणे आवश्‍यक आहे, याकडे शिक्षक भारतीने लक्ष वेधले होते.

लोअर प्रायमरीसाठी (1ली ते 5वी) यासाठी आरटीईने 200 दिवस / किमान 800 तास शिक्षकांसाठी निश्‍चित केले आहेत, तर अपर प्रायमरीसाठी (6वी ते 8वी) यासाठी 220 दिवस / किमान 1000 तास निश्‍चित केले आहेत. अध्यापनासाठी आठवड्याला कमाल मर्यादा 30 तासांची आहे. याचा अर्थ त्याहून अधिक काळ विद्यार्थ्यांना ताण देणे हे कायद्याशी विसंगत आहे, असा प्रश्न याबद्दल कपिल पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.

“आरटीई‘च्या हेतूशी सुसंगत अंमलबजावणी मुंबईसारख्या शहरांमध्ये करावयाची असेल, तर अपर प्रायमरीसह माध्यमिक शाळा म्हणजे 6 वी ते 10वीचे वर्ग सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते 12.30 या वेळेत, तर 1ली ते 5वीचे वर्ग दुपारी 1 ते 5.30 या वेळेत चालवता येतील.
विद्यार्थी व शिक्षकांसह शाळांना शनिवार व रविवार अशी दोन दिवस सुटी असेल. हे दोन दिवस संस्थांना अन्य शैक्षणिक व शाळाबाह्य उपक्रमासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी इमारतीचा उपयोग करता येईल, विजेची बचत होईल आणि विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनावरचा ताण दूर होणार आहे.