डॉ. आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – बडोले

0
11

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर खरेदीची प्रक्रिया मे-2015 अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रधान सचिव उज्ज्वल उके यांचे शिष्टमंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी प्रक्रिये संदर्भात लंडन दौरा करुन आज मुंबईत परतले. त्यासंबंधित माहिती देण्यासाठी मंत्रालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. बडोले बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील 10, किंग हेन्‍रीज, एन डब्ल्यू 3, आरपी या घराची पाहणी शिष्टमंडळाने केली. भारताचे लंडन येथील उपउच्चायुक्त डॉ. विरेंद्र पॉल, एस.एस.सिध्दू (मिनिस्टर कोऑरडीनेशन), प्रीतम लाल, फर्स्ट सेक्रेटरी यांच्या सोबत लंडन येथील घर खरेदी प्रक्रिया मे-2015 च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबतची सकारात्मक चर्चा करण्यात आली, असे सांगून श्री. बडोले म्हणाले की, या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल. राज्य शासनामार्फत ही मालमत्ता खरेदी करण्यात येत आहे. शासकीय, प्रशासकीय व वित्तीय नियमांचे पालन करण्यात येत असून सदर मालमत्तेचे मुल्यांकन करण्यासाठी लंडन येथील सर्व्हेअर नियुक्तीची प्रक्रिया उच्चायुक्तांमार्फत सुरु आहे. त्याबाबत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मार्गदर्शन घेण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्या नावाने सदर मालमत्ता राहणार असल्यामुळे शासनामार्फत व्यवस्थापन व देखभालीकरिता भारतीय उच्चायुक्त, लंडन यांना प्रातिनिधिक हक्क प्रदान करण्यात येतील तसेच भारतीय उच्चायुक्त व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, केंद्र शासनाच्या मान्यतेने समितीची नियुक्ती करण्यात येईल. या समितीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव दर्जाचे अधिकारी व भारतीय उच्चायुक्तांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल तसेच सदर समितीमध्ये राज्य शासनाचा प्रतिनिधी, लंडन येथील भारतीय वंशाचे प्रतिनिधी सल्लागार यांचा समावेश असेल. घराच्या खरेदी नंतर दुरुस्ती व भविष्यातील देखभालीसाठी एक पूर्णवेळ केअरटेकरची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही श्री. बडोले यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रधान सचिव उज्ज्वल उके व संबंधित अधिकारी उपस्थित होते.