महाराष्ट्रातील पहिले ट्रिपल आयटी नागपूरात

0
14

गोंदिया,दि.14: महाराष्ट्रात पहिले इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ट्रिपल आयटी नागपूरमध्ये होणार यावर आज शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.नागपूरमध्ये इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करीता केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने हिरवा कंदिल दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करुन जाहीर केले. या प्रस्तावाला मान्यता दिल्याबाबात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांचे ट्विटरवरुन जाहीर आभारही मानले आहेत.राज्यातील हे पहिलं-वहिलं ट्रिपल आयटी असणार आहे. उपराजधानीतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीकरिता बुटीबोरी जवळील जमीनीचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र गेले अनेक महिने हा प्रस्ताव अडकून पडला होता. अखेर आज या प्रस्तावाला हिरवा कंदिल देण्यात आला.आयआयआयटीकरिता टीसीएस आणि एडीसीसी या दोन कंपन्यांसोबत सहयोग करार करण्यात आला. या संस्थेकरिता ७० टक्के निधी केंद्र सरकारकडून, २० टक्के राज्य सरकार आणि दहा टक्के गुंतवणूक खासगी भागीदाराकडून अपेक्षित आहे. तर संस्थेकरिता जमीन, इमारत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी बाबींकरिता केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे.