ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रस्तावास 13 मार्चपर्यंत मुदतवाढ

0
287

गोंदिया,दि.04 : इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2019-20 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना नव्याने सुरु करण्यात आलेली आहे. सदर शिष्यवृत्ती ही ऑफलाईन स्वरुपाची झालेली असून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक पंचायत समिती स्तरावर येणाऱ्या सर्व गट संसाधन केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निश्चित केलेल्या तारखेला गट संसाधन केंद्रामध्ये काही शाळांनी कार्यालयीन वेळेत हार्ड व सॉफ्ट कॉपी (पेन ड्राईव) मध्ये परिपूर्ण प्रस्ताव सादर केले होते. परंतु अद्यापही बऱ्याच शाळेमार्फत प्रस्ताव विहीत वेळेत सादर करण्यात आलेले नाही. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून प्रस्ताव सादर करण्यास 13 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पंचायत समिती अंतर्गत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना प्रस्ताव विहीत वेळेत सादर करण्यास आपल्या स्तरावरुन तात्काळ सूचित करावे. ज्या शाळांचे प्रस्ताव विहीत वेळेत प्राप्त होणार नाही व यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापकास सर्वस्वी जवाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रस्ताव सादर करतांना सर्व मुख्याध्यापकांनी प्रस्तावासोबत यापूर्वी दिलेले प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांचे स्वाक्षरीने योगेश कढव, समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांचेकडे विहीत नमून्यातच सादर करावे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांनी कळविले आहे.