व्हॉटसअपचा वापर वार्षिक नियोजन निर्मितीसाठी

0
10

चंद्रपूरदि.१२:, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणे होण्यासाठी आधुनिक यंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. या संदेशावर चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांनी काही दिवसापूर्वी एटीएफ नावाचा व्हॉटसअप गृप तयार केला. चर्चेअंती शिक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्यात एकसमान वार्षिक नियोजन असावे, ही संकल्पना पुढे आली. या नियोजनाच्या निर्मितीची जबाबदारी या सक्रीय शिक्षकांच्या व्हॉटसअप ग्रुपने घेतली आहे.
यासंदर्भात सक्रीय शिक्षकांच्या या गटाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग प्राथमिक युनिसेफच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन या नाविण्यपूर्ण संकल्पनेबाबत चर्चा केली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पूरक असलेल्या व जिल्ह्यातील सर्व शाळातील नियोजनात एकसूत्रता आणणारी ही कल्पना सर्वांना आवडली. मात्र हे नियोजन ऐच्छिक राहील. यापेक्षा चांगले नियोजन जर काही शिक्षक स्वत: तयार करीत असतील तर त्यांना ते वापरण्याची मुभा असावी, असे ठरविण्यात आले.
अभ्यासक्रम सारखा असतानाही प्रत्येक तालुक्यात व शाळात नियोजनात, कामाच्या दिवसात, सुट्टय़ात, उपक्रमात तसेच अधिकार्‍यांच्या शेर्‍यात व अपेक्षेत मात्र भिन्नता दिसून येत होती. तसेच शिक्षक काही सर्वच विषयात तज्ज्ञ नसतो. मात्र त्याला सर्वच विषय शिकवावे लागतात. त्यामुळे इतर तज्ज्ञ शिक्षकांचे उपक्रम, संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचवाव्या, या हेतूने जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातील, तालुक्यातील सक्रीय शिक्षकांनी स्वत:हून नियोजन तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षकांचा वेळ वाचवून तो अध्यापनात खर्ची घालायला कामी पाडणारा व शिक्षकांच्या पुढाकाराने होत असलेला हा चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातीलही पहिलाच प्रयोग ठरावा. या उपक्रमाचे जिल्ह्यातील शिक्षकांनी स्वागत केले आहे व कधी हे नियोजन हाती पडते, याची ते वाट पाहत आहेत.
नियोजनाच्या या वहीमध्ये वर्षभर राबवायचे विविध उपक्रम, शिक्षकाला त्याचे स्वत:चे उपक्रम लिहिण्याचे स्वातंत्र, काही सुधारणा सूचवायच्या असल्यास सूचनांचे स्वतंत्र पान, राज्यभरातील उपक्रमशिल शिक्षकांचे यशस्वी उपक्रम, शैक्षणिक वेबसाईटची व पुस्तकांची माहिती, काही अडचण आल्यास मदतीसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे संपर्क क्रमांक, असा शिक्षणप्रक्रिया स्वयंपूर्ण करणारा माहितीचा भरगच्च खजीनाच या नियोजनाच्या उपक्रमात असणार आहे.
शिक्षण हक्क अधिनियमानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी दज्रेदार साहित्य वापरुन अध्यापन करावे, असे नमूद आहे. याबाबत शिक्षकांना प्रयोगाचे, उपक्रमाचे स्वातंत्र दिले आहे. यामुळे हा उपक्रम राज्यभरातील शिक्षकांना राबविण्याचे स्वातंत्र द्यावे. याबाबत एटीएफच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले आहे.