हायकोर्टाची आमदार होळींच्या सदस्यत्वावर टांगती तलवार

0
12

गडचिरोली दि.१२: गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना उत्तर सादर करण्यासाठी २६ जून २0१५ ही अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे आमदार डॉ. होळी यांचे सदस्य कायम राहते की रद्द होते याविषयी विविध तर्कवितर्क लढविले जात आहे. भाजपच्याही वतरुळात या प्रश्नावरून खमंग चर्चा सध्या सुरू आहे.
१५ ऑक्टोबर २0१४ रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ.देवराव होळी हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. परंतु डॉ. होळी हे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते आणि विजयी होण्याच्या क्षणापयर्ंत त्यांचा राजीनामा शासनाने मंजूर केला नव्हता. त्यामुळे डॉ.होळी यांनी राजीनामा मंजूर न करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला मॅटमध्ये आव्हान दिले होते. परंतु मॅटने २८ ऑक्टोबर २0१४ रोजी त्यांची याचिका खारिज केली होती. आ.डॉ.होळी यांनी मॅटच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
शिवाय डॉ. आ.होळी हे शासकीय सेवेत असताना शकुंतला मेमोरियल सोसायटीचे अध्यक्षही होते. या संस्थेने एनआरएचएम योजनेंतर्गत सिकलसेल कार्यक्रम राबविला होता. यासंबंधीची सुमारे ८ लाख ६८ हजार ३६३ रुपयांची रिकव्हरी या संस्थेकडे असून, हे प्रकरणही गडचिरोलीच्या न्यायालयात सुरु आहे. आ.डॉ.होळी यांचा राजीनामा मंजूर नसणे आणि त्यांच्या संस्थेवर शासकीय रिकव्हरी असणे या दोन्ही मुद्दय़ांवर त्यांना अपात्र घोषित करावे, या मागणीसाठी फारवर्ड ब्लॉकचे प्रतिस्पर्धी उमेदवार अँड. नारायण जांभूळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाने डॉ. होळी यांना नोटीस पाठवून उत्तर सादर करण्यास सांगितले होते. परंतु डॉ. होळी यांनी दोनदा मुदतवाढ मागितली. पुढे दोन्ही वेळा त्यांनी न्यायालयाला उत्तर सादर केले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आ. डॉ.होळी यांना त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी १0 जून ही अंतिम मुदत दिली होती. १0 तारखेला आ.डॉ. होळी यांच्या वकिलांनी नियमानुसार शेवटची नोटीस प्राप्त झाल्यापासून ९0 दिवसांच्या आत उत्तर सादर करता येते, असा युक्तीवाद करुन न्यायालयाला पुन्हा मुदतवाढ मागितली आहे. न्यायालयाने आ.डॉ.देवराव होळी यांना २५ मार्च २0१५ रोजी शेवटची नोटीस बजावली होती. त्यामुळे आता आमदार डॉ. होळी यांना २६ जून २0१५ ही अंतिम तारीख उत्तर देण्यासाठी मिळाली आहे. आ.डॉ.होळी यांच्यातर्फे अँड.खानझोडे, तर अँड.नारायण जांभूळे यांच्यातर्फे अँड.प्रदीप वाटोळे काम पाहत आहेत. तारीख जवळ येत असल्याने होळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास फेरनिवडणूक होते काय यावरून मतदार संघात सध्या खमंग चर्चा आहे.