चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवीमध्ये होणार- विनोद तावडे

0
36

मुंबई दि. २५-: शिक्षण हक्क कायद्यातील (RTE) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा चौथीऐवजी पाचवीमध्ये व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा सातवीऐवजी आठवीमध्ये घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.

आरटीईनुसार आता प्राथमिक 1 ली ते 5 वी, उच्च प्राथमिक 6 वी ते 8 वी आणि माध्यमिक 9 वी ते 10 वी असे तीन विभाग करण्यात आले आहेत. त्यानुसार शिष्यवृत्तीची परीक्षा 5 वी व 8 वीमध्ये होणे अपेक्षित आहे. शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये जर ही परीक्षा घेतली तर या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा यंदा परीक्षा द्यावी लागेल, म्हणून शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य होईल, असे श्री.तावडे यांनी सांगितले.

यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे. या परीक्षा पद्धतीत व अभ्यासक्रमात काही बदल होणे गरजेचे आहे, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी एक शिक्षण समिती नेमण्यात येईल. त्यांच्या सुचनांनुसार परिक्षाविषयक मार्गदर्शन डिसेंबर 2015 पर्यंत करण्यात येईल, असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.