महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा ;जिल्हास्तरीय प्रशिक्षण व सादरीकरण स्पर्धेला उत्तम प्रतिसाद 

0
16
यश दारोळकर,संतोष वानखेडे व डॉ सोमनाथ जाधव यांची जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत निवड
वाशिम दि 15– नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा वाशीम येथे 13 ऑक्टोबर रोजी राजस्थान आर्य महाविद्यालय येथे संपन्न झाली. या स्पर्धेत स्पर्धेत 40 इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली.या कार्यक्रमाकरिता 130 युवक-युवतींची उपस्थिती होती.
     जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत उपस्थित नवउद्योजक /उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गवलवाड, विदर्भ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय तोष्णीवाल, कृषी विज्ञान केंद्र करडाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रवींद्र काळे, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पगारिया, जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज एमआयडीसी वाशिमचे संचालक कृष्णा चौधरी, इंनक्यूबेशन सेंटर पीडीकेव्हीचे संचालक महेंद्रसिंग राजपूत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशिमचे प्राचार्य श्री भालेराव व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांची उपस्थिती होती.
       जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत नवउद्योजक/उमेदवार यांना कृषी, शिक्षण,आरोग्य,शाश्वत विकास ( कचरा व्यवस्थापन,पाणी,स्वच्छ ऊर्जा स्मार्ट ई.) पायाभूत सुविधा आणि गतिशीलता ई – प्रशासन व इतर क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करावयाच्या होत्या. त्या अनुषंगाने 40 संकल्पनांची नोंदणी झाली.त्यापैकी प्रत्यक्षपणे 23 नवसंकल्पनेचे नवउद्योजक/ उमेदवारांकडून सादरीकरण करण्यात आले.
         स्पर्धेत उमेदवारांनी सादर केलेल्या संकल्पनांचे ज्युरी कमिटीकडून एकूण 11 विविध क्षेत्रांशी संबंधित उपस्थित तज्ञांकडून विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन गुणांकन करण्यात आले. त्यानुसार यश दारोळकर यांच्या ऑटोमॅटिक व्हेईकल एक्सीडेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम याबाबतच्या सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रथम क्रमांकाचे गुण मिळाले. द्वितीय क्रमांक संतोष वानखेडे यांनी कमी खर्चातील व टाकाऊ वस्तुपासून तयार केलेले कृषीविषयक अवजारे याबाबतचे सादरीकरणाला द्वितीय क्रमांक आणि डॉ.सोमनाथ जाधव यांनी बायोडिझेल प्रॉडक्शनविषयीच्या सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे गुण प्राप्त केले. जिल्हास्तरावरील विजेत्या नवउद्योजकांना 16 ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राजभवन येथे सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बजाज यांनी दिली.
        जिल्हास्तरावर राजस्थान आर्य कॉलेज येथे 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण सादरीकरण स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनकरिता महात्मा गांधी फेलो प्रतीक बाराहाते यांचे सहकार्य लाभले. याशिवाय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयातील रोजगार मार्गदर्शन अधिकारी सीमा खिरोडकर, दीपक भोळसे, संजय उगले, अमोल मरेवाड व सिद्धार्थ खेडेकर तसेच राजस्थान आर्य महाविद्यालयातील प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अनिल बनसोड, प्रा सुरेश मापारी व मनोज मोरे यांनी सहकार्य केले.