महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ नोव्हेंबर पासून सुरुवात

0
10

*मुंबई*- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर 2022 पासून यांची सुरुवात होणार आहे. मंगळवार, १ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिस्टन टेक्निकल स्कुल, पहिला मजला, मेट्रो सिनेमाजवळ, मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे.

विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, नोबल पारितोषिक विजेते रिच रॉबर्ट्स, मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या डिजिटल फलकाचे अनावरण होणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रारंभ ऑगस्ट २०२२ मध्ये करण्यात आला आहे. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगाशी संलग्न आहे.